सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – आ. रोहित पवार
जामखेड तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासोबत बैठक; भूसंपादन प्रक्रियेची पारदर्शक फेरतपासणी करण्याची मागणी
जामखेड | प्रतिनिधी
प्रस्तावित सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग जामखेड तालुक्यातील १३ गावांमधून जाणार असून, या महामार्गासाठी संबंधित गावांतील शेतकऱ्यांना प्रशासनाकडून भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, या भूसंपादन प्रक्रियेत अनेक त्रुटी आणि संभ्रम निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील बाधित शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची बैठक घेतली.
या बैठकीत भूसंपादन प्रक्रियेतील त्रुटी दूर करणे, शेतजमिनींचे योग्य मूल्यांकन करणे, शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून देणे, तसेच भूसंपादनासंदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणी आणि हरकती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महामार्गाला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांवर अन्याय नको!
महामार्ग हा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून तो झालाच पाहिजे, त्याला कोणताही विरोध नाही. मात्र, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये, ही आमची ठाम भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचे योग्य मूल्यांकन होऊन त्यांना कायदेशीर आणि न्याय्य मोबदला मिळणे आवश्यक आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी मांडले.
तसेच संपूर्ण भूसंपादन प्रक्रियेची पारदर्शकपणे फेरतपासणी करण्यात यावी, शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या सर्व हरकतींचे निराकरण करण्यात यावे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा निकाल लागेपर्यंत कोणतीही भूसंपादनाची पुढील कार्यवाही करू नये, अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.
या बैठकीस NHAI चे वाबळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख संजय कुंभार, भूसंपादन अधिकारी समन्वयक दळवी, जामखेडचे तहसीलदार शीतलकुमार साळवे, गटविकास अधिकारी (BDO) शुभम जाधव, तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, बाधित शेतकरी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या जमिनींचे योग्य मूल्यांकन, पारदर्शक भूसंपादन प्रक्रिया आणि न्याय्य मोबदला मिळणे हाच या संपूर्ण विषयातील महत्त्वाचा मुद्दा असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा प्रश्न लावून धरण्याची भूमिका आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे.
पत्रकार रवीकुमार शिंदे
संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर
Executive Member – AIMA MEDIA
Ahilyanagar District, Maharashtra
All India Media Association
हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक
भारतीय पत्रकार अधिकार – महाराष्ट्र राज्य
आपलं सत्य अहिल्यानगर
विश्वसनीय • निष्पक्ष • तेज डिजिटल न्यूज
#RohitPawar #Jamkhed #SuratChennaiExpressway #LandAcquisition #AhilyanagarNews


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.