Breaking News

माहिती अधिकार कायद्याची गळचेपी थांबवा; महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 विरोधात वकिलांचा एल्गार! "माहिती अधिकारासाठी वकिलांनी एकत्रित येण्याची देशातील एकमेव ऐतिहासिक घटना" – ॲड. शोमितकुमार व्ही. साळुंके

 

अहिल्यानगर | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील कथित नागरिकविरोधी तरतुदींविरोधात आता वकील वर्गानेही उघडपणे आवाज उठविला आहे. अहिल्यानगर बार असोसिएशनच्या शेकडो वकिलांनी एकत्र येत मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करून संबंधित नियम तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील अधिवक्ता ॲड. शोमितकुमार व्ही. साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती अधिकार कायद्याच्या विरोधात करण्यात आलेल्या नियमावलीविरोधात वकील संघटनेने आंदोलन करून शासनाला निवेदन देण्याची ही राज्यातील पहिली घटना मानली जात आहे.

न्यायालयात उपस्थित असलेल्या तब्बल 293 वकिलांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले. माहितीचा अधिकार अधिनियम हा शासनाला जबाबदार धरण्यासाठी सामान्य नागरिकांच्या हातातील सर्वात प्रभावी आणि लोकशाहीवादी साधन असल्याचे नमूद करत, नव्या नियमांमुळे हा कायदा अधिक गुंतागुंतीचा, खर्चिक आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

वकिलांच्या आक्षेपातील प्रमुख मुद्दे

  • अपील किंवा तक्रारीच्या सुनावणीवेळी वकिलांची मदत घेण्यास मनाई.
  • माहिती मागणाऱ्या अर्जदारांकडून ओळखपत्राची सक्ती.
  • माहिती मागण्यामागील कारण विचारण्याची तरतूद.
  • पुनरावृत्ती अर्जांवर निर्बंध.
  • विविध शुल्कांमध्ये करण्यात आलेली वाढ.

विशेषतः नियम 20(3) अंतर्गत अपील किंवा तक्रारीच्या सुनावणीवेळी वकिलांची मदत घेण्यास मनाई करणारी तरतूद अत्यंत धक्कादायक असल्याचे वकिलांनी म्हटले आहे. कायद्याचे गुंतागुंतीचे प्रश्न असताना नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या वकिलांची मदत घेण्याचा अधिकार नाकारणे हे न्यायप्रवेशाच्या मूलभूत अधिकारावर आघात करणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

"माहितीचा अधिकार हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार"

“माहितीचा अधिकार हा शासनाची कृपा नसून नागरिकांचा कायदेशीर आणि घटनात्मक अधिकार आहे. या अधिकारावर निर्बंध आणण्याचा कोणताही प्रयत्न स्वीकारला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका वकिलांनी निवेदनाद्वारे मांडली आहे.

तसेच संबंधित नियम तात्काळ स्थगित करून राज्यातील वकील संघटना, माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक प्रतिनिधी यांच्याशी व्यापक चर्चा करून नव्याने नियमावली तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना आज हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ व कनिष्ठ वकील उपस्थित होते.

जनहित याचिकेची तयारी

दरम्यान, माहिती अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या कथित नागरिकविरोधी बदलांना आव्हान देण्यासाठी ॲड. शोमितकुमार व्ही. साळुंके हे “पार्टी इन पर्सन” म्हणून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. येत्या आठवड्यात ही याचिका दाखल होण्याची शक्यता असून, माहितीच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी न्यायालयीन आणि लोकशाही मार्गाने लढा अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

– आपलं सत्य अहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.