Breaking News

राष्ट्रीय सांख्यिकी दिन 2026 : प्रशासकीय आकडेवारीच्या प्रभावी वापरावर दीपक दातीर यांचा भर


 

प्रशासकीय आकडेवारीचा प्रभावी वापर करण्यावर भर – दीपक दातीर

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात 'राष्ट्रीय सांख्यिकी दिन' उत्साहात साजरा

अहिल्यानगर, दि. २९ : प्रशासकीय आकडेवारी ही देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक नियोजनाचा भक्कम पाया असून तिचा प्रभावी वापर केल्यास विविध धोरणांची अंमलबजावणी अधिक परिणामकारकपणे करता येते. त्यामुळे प्रशासकीय आकडेवारीची गुणवत्ता, अचूकता आणि विश्वासार्हता वाढविण्यावर विशेष भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपआयुक्त तथा जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी केले.

विख्यात संख्याशास्त्रज्ञ प्रा. प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा सांख्यिकी कार्यालयात 'राष्ट्रीय सांख्यिकी दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षी सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने निश्चित केलेल्या 'प्रशासकीय आकडेवारीच्या क्षमतेचा योग्य उपयोग' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहआयुक्त योगेश उगले प्रमुख उपस्थित होते.

यावेळी दीपक दातीर म्हणाले की, प्रशासकीय स्तरावर संकलित करण्यात येणारी अचूक माहिती देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे वास्तव चित्र समोर आणते. या माहितीच्या आधारे विविध निर्देशांक अधिक अचूकपणे तयार होतात तसेच धोरणात्मक निर्णय अधिक प्रभावीपणे घेता येतात.

सहआयुक्त योगेश उगले यांनी सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या (GDP) मोजणीसह विविध सांख्यिकी अहवालांच्या निर्मितीत सांख्यिकीचे असलेले महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात सांख्यिकी क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. वैभव गाडगे यांनी प्रा. महालनोबीस यांच्या सांख्यिकी पद्धती आणि राष्ट्रीय विकासातील योगदानाविषयी माहिती दिली. माधुरी खटके, संदीप मते आणि ईश्वर गायकवाड यांनी राष्ट्रीय नमुना पाहणी, मूल्यमापन, पशुधन गणना, कृषी किमती तसेच माहितीच्या गुणवत्तेबाबतचे अनुभव मांडले. सेवानिवृत्त सहायक जिल्हा नियोजन अधिकारी शिवाजी गवारे यांनी माहिती संकलनातील अडचणी व त्यावरील उपाय स्पष्ट केले. सहायक संशोधन अधिकारी प्रकाश कोमार यांनी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या कार्याचा आढावा सादर केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक संशोधन अधिकारी रवि के. निकाळजे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.