संत भगवानबाबा ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू
अहिल्यानगर, दि.२२-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शेवगाव येथे सुरू करण्यात आलेल्या संत भगवानबाबा ऊसतोड कामगारांच्या मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन गृहपाल बाळासाहेब बडे यांनी केले आहे.
शेवगाव येथे ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी प्रत्येकी १०० मुले व १०० मुलींची निवासी व्यवस्था असलेले शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. या वसतिगृहामध्ये इयत्ता पाचवीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, मोफत भोजन तसेच विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रवेशासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून मुलगा अथवा मुलगी ऊसतोड कामगारांचा पाल्य असावा. यासाठी संबंधित ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी शेवगाव शहरातील कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेशित असणे बंधनकारक आहे.
प्रवेशासाठी ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, मागील इयत्तेचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला अथवा बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, बँक खाते तपशील, रेशनकार्ड, रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र आदी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, आखेगाव रोड, शेवगाव येथे प्रत्यक्ष अथवा ७९७२२६८५०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
#वसतिगृहप्रवेश2026 #HostelAdmissions #अहिल्यानगर #Ahilyanagar #ऊसतोडकामगार #SugarCaneWorkers #संतभगवानबाबावसतिगृह #StudentWelfare

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.