रोहित पवार : कर्जमाफीच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात एल्गार; सरकारला अंतिम इशारा
छत्रपती संभाजीनगर, दि. ३० जून : आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एल्गार आंदोलन करण्यात आले.
यावेळी रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सरकारने कर्जमाफीबाबत दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचे सांगितले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, खासदार निलेश लंके, खासदार कल्याण काळे, खासदार अमर काळे, खासदार बजरंग सोनवणे, राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर, सलील देशमुख, माजी आमदार सुनील भुसारा यांच्यासह मराठवाड्यातील हजारो शेतकरी आणि आजी-माजी पदाधिकारी सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्जमाफी योजनेतील अटी-शर्ती हटविण्याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनाचा मान राखत सामान्य नागरिकांची गैरसोय आणि बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांचा विचार करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
मात्र, सरकारने यावेळीही दिलेला शब्द पाळला नाही तर राज्यभर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवून दिली जाईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.