अहिल्यानगरला वादळी पावसाचा इशारा; 18-19 जुलैसाठी 'येलो अलर्ट'
🚨 ब्रेकिंग | अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा 'येलो अलर्ट' जारी
अहिल्यानगर | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 18 आणि 19 जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा देत 'येलो अलर्ट' जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी पुढील दोन दिवस विशेष सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यास किंवा धरणांतून पाणी सोडल्यास भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता दौंड पुलाजवळ भीमा नदीत 3,472 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
नदी, ओढे किंवा नाल्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यास ते ओलांडू नका.
धरण, नदी परिसरात पर्यटन किंवा सेल्फी काढणे टाळा.
वीजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, मोकळ्या मैदानात, विजेच्या खांबाजवळ किंवा धातूच्या वस्तूजवळ उभे राहू नका.
विजा चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळा.
ट्रॅक्टर, शेतीची अवजारे आणि दुचाकींपासून सुरक्षित अंतर ठेवा.
जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेऊ नका.
डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका असल्याने घाट रस्त्यावरील प्रवास शक्यतो टाळा.
जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवा.
आपत्कालीन संपर्क
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
जिल्हा नियंत्रण कक्ष: 0241-2323844 / 0241-2356940
आपत्कालीन सेवा: 112
आपत्ती हेल्पलाईन: 1077
प्रशासनाचे आवाहन: अफवांवर विश्वास ठेवू नका. हवामान खात्याचे आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकृत अपडेट्सच लक्षात घ्या व स्वतःची तसेच कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करा.
#अहिल्यानगर #YellowAlert #WeatherUpdate #पाऊस #IMD #RainAlert #भीमानदी #आपत्तीव्यवस्थापन #Maharashtra #ApleSatyaAhilyanagar

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.