खरीप हंगाम 2026 : उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाच्या शिफारशीनुसारच पेरणी करा; राहाता तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
शिर्डी | दि. ११
राहाता तालुक्यातील सर्व सहा मंडळांमध्ये सुमारे १०० मि.मी. पावसाची नोंद झाल्याने जमिनीत वापसा स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ मध्ये हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पिकांचे योग्य नियोजन करावे आणि कृषी विभागाने शिफारस केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शास्त्रीय पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे.
गतवर्षी राहाता तालुक्यात ५७ हजार ०८४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती. त्यामध्ये सोयाबीन २६ हजार २५४ हेक्टर, मका ९ हजार २८५ हेक्टर आणि कापूस ९ हजार ७०६ हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. यंदा २५ हजार हेक्टरवर सोयाबीन, ११ हजार हेक्टरवर मका आणि ९ हजार ६०० हेक्टरवर कापूस लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाणी, जमिनीचा प्रकार, हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पेरणीपूर्वी माती परीक्षण करून मृदा आरोग्य पत्रिकेनुसार नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, झिंक आणि बोरॉन यांसारख्या अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा. रासायनिक खतांचा अतिरेक टाळून शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत व जैविक खतांचा वापर वाढवावा. तसेच पेरणीसाठी केवळ प्रमाणित व सत्यप्रत बियाण्यांचा वापर करावा. वाणाची निवड करताना उगवणक्षमता, कालावधी आणि रोगप्रतिकारक क्षमता लक्षात घेणे आवश्यक आहे.
कोरडवाहू भागात किमान ७५ ते १०० मि.मी. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच घाई न करता पेरणी करावी. शिफारशीनुसार अंतर, खोली आणि बियाण्याचे प्रमाण राखावे. बीजजन्य व जमिनीतून पसरणाऱ्या रोगांपासून संरक्षणासाठी प्रथम बुरशीनाशकाची आणि त्यानंतर रायझोबियम, पीएसबी व ट्रायकोडर्मा या जैविक घटकांची बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
राहाता तालुक्यात मध्यम ते भारी जमीन असल्याने अतिरिक्त पाण्याचा निचरा, ओलावा संवर्धन आणि पिकांची एकसमान वाढ यासाठी बीबीएफ (Broad Bed Furrow) पद्धतीचा अवलंब उपयुक्त ठरतो. पिकांच्या वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करून पीक अवशेषांचा वापर करावा तसेच नत्राचा विभागून वापर करावा.
कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिवळे व निळे चिकट सापळे, फेरोमोन सापळे आणि जैविक कीडनियंत्रणाचा वापर करावा. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. तसेच पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांच्या कालावधीत तणांचे प्रभावी नियंत्रण करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, पीक संरक्षण आणि जैविक शेतीसह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर पात्रतेनुसार अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.