Breaking News

विधानपरिषदेत सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश; शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंगसह नशायुक्त पदार्थांच्या विक्रीवर बंदी

मुंबई, दि. ३ : विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी गेल्या दोन वर्षांपासून शाळांच्या परिसरात स्टिंगसह नशायुक्त पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याची सातत्याने मागणी केली होती. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्य शासनाने शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंगसह नशायुक्त पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाबद्दल आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आभार मानले.

सत्यजित तांबे यांनी 12 जुलै 2024 रोजी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला होता. त्यानंतर 11 सप्टेंबर 2024 रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तत्कालीन मंत्र्यांना पत्र देऊन शाळांच्या परिसरात कॅफेनयुक्त पदार्थांच्या विक्रीबाबत बैठक घेण्याची मागणी केली. पुढे 23 आणि 29 जानेवारी 2025 रोजी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठका होऊन एनर्जी ड्रिंक्सवरील धोरण, जनजागृती आणि निर्बंध यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच 1 जुलै 2025 रोजीही त्यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा जोरदारपणे मांडला.

तांबे यांनी केवळ विक्रीवर निर्बंध न आणता, नशायुक्त व भेसळयुक्त पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवरही सातत्याने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेल्या धाडी आणि कारवाया अधिक प्रभावीपणे सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या नशायुक्त व भेसळयुक्त पदार्थांविरोधातील लढा भविष्यातही कायम ठेवण्याचा निर्धार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.