अमृतच्या वतीने ३१ जुलै रोजी अहिल्यानगर येथे विशेष प्रशासकीय शिबिर महाराजस्व अभियानानिमित्त आयोजन
अहिल्यानगर, दि. २८ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अपर तहसील कार्यालयाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत ३१ जुलै रोजी स्वस्तिक चौक येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात विशेष प्रशासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अमृत संस्थेचे लाभार्थी तसेच लक्ष्यित गटातील महिला, पुरुष, युवक, युवती आणि विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर शहर मतदारसंघातील या विशेष प्रशासकीय शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे.
या शिबिरात अमृत उद्योजकता विकास कार्यक्रमाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच अमृत संस्थेच्या योजनांचा स्टॉल आणि विविध शासकीय विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात येणार असून, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, दाखले, अर्ज प्रक्रिया तसेच प्रशासकीय सेवांबाबत नागरिकांना थेट मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय अमृत संस्थेच्या आगामी प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगाराच्या संधी आणि विविध उपक्रमांची माहितीही लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अमृत संस्थेविषयी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा संस्थेचा लक्ष्यित गट आहे. यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी आणि भूमिहार आदी जातींचा समावेश आहे. या जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो.
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
संपर्क क्रमांक : ९११२२२८७६९
जिल्हा कार्यालय : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्रासमोर, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर – ४१४००३
#अमृतसंस्था #AmrutSanstha #अहिल्यानगर #Ahilyanagar #महाराजस्वअभियान #MaharajaswaAbhiyan #विशेषप्रशासकीयशिबिर

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.