महसूल समाधान शिबिरातून लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी; डिजिटल सेवांवर भर - प्रा. राम शिंदे
अहिल्यानगर | प्रतिनिधी
प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला असून नागरिकांना वेळेत आणि सुलभ सेवा देण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यास सरकार कटिबद्ध असून, महसूल समाधान शिबिरातून लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथील शारदाबाई पवार सभागृहात आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी विधान परिषद सदस्य सुनील कर्जतकर, नगराध्यक्षा छायाताई शेलार, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, तहसीलदार रवी सतवन, गट विकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, शासन हे सत्तेचे नव्हे तर सेवेचे माध्यम आहे. प्रत्येक प्रशासकीय अधिकारी हा शासनाच्या निर्णयांचा जनतेपर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा असून प्रत्येक नागरिकाला वेळेत, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
त्यांनी महसूल विभागातील डिजिटल सुधारणांचा विशेष उल्लेख करत उत्पन्न, जात आणि अधिवास प्रमाणपत्रे आता अधिक जलद उपलब्ध होत असल्याचे सांगितले. ई-पीक पाहणी प्रणालीमुळे पीकस्थितीची अचूक माहिती मिळत असून विविध अनुदान आणि कर्जमाफी योजनांचा लाभ थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे नागरिकांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने लाभ वितरण अधिक विश्वासार्ह झाले आहे.
प्रा. शिंदे यांनी पुढे सांगितले की, महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे निश्चित कालावधीत निकाली काढण्यासाठी 'झिरो पेंडन्सी' अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. तसेच पोटखराबा जमीन लागवडीयोग्य करण्याची मोहीम, शासकीय जमिनीवरील घरे नियमित करणे आणि महिलांच्या वारसा हक्कांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे.
सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राने नेतृत्व करावे, यासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद सदस्य सुनील कर्जतकर यांनी राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. महसूल समाधान शिबिरामुळे नागरिकांच्या अनेक समस्या जागेवरच निकाली निघत असून लोकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी सांगितले की, शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांसाठी १९ हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे.
शिबिरात महसूल, आरोग्य, पुरवठा, महिला व बालविकास, ग्रामविकास, शिक्षण, कृषी, वन विभाग आणि भूमी अभिलेख विभागांच्या माध्यमातून उत्पन्न प्रमाणपत्रे, शिधापत्रिका, विविध योजनांसाठी अर्ज स्वीकारणे, आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि तक्रार निवारण अशा अनेक सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.