Breaking News

आषाढी वारी २०२६ : वारकऱ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि समाधानकारक सुविधा द्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


पंढरपूर | प्रतिनिधी

आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे आणि ही वारी "स्वच्छ, सुरक्षित आणि निर्मळ" करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक पंढरपूरात येतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या निवास, पिण्याचे पाणी, आरोग्य, वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छतेच्या सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. दर्शन रांगा, वाळवंट परिसर, भक्ती सागर आणि चंद्रभागा नदीपात्राची नियमित स्वच्छता राखावी. तसेच सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून वारकऱ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळेल याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

"श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक वारकरी समाधानाने आणि चांगला अनुभव घेऊन परतला पाहिजे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून उत्कृष्ट प्रशासनाचे उदाहरण निर्माण करावे," असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, राजेंद्र खरे, उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, नगराध्यक्षा प्रणिती भालके, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि वारकरी-केंद्रित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.