Breaking News

खरीप हंगामातील राज्यस्तरीय पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

 खरीप हंगामातील राज्यस्तरीय पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन


अहिल्यानगर, दि. २८ : राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने सन २०२६-२७ च्या खरीप हंगामातील राज्यस्तरीय पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून यंदापासून स्पर्धेची अर्ज प्रक्रिया स्वतंत्र ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.


सर्वसाधारण व आदिवासी गटांसाठी ही स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य अशा तीन स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण अकरा पिकांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील उत्पादकता आधारभूत धरून जिल्हा व राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.


स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. तसेच एकाच वेळी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सहभागासाठी भात पिकाखाली किमान २० गुंठे, तर इतर पिकांसाठी किमान ४० गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे.


यापूर्वी पीकस्पर्धेची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी यंदापासून पीकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन संगणक प्रणाली सुरू करण्यात आली आहे.


अर्जासोबत फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांनी जात प्रमाणपत्र तसेच बँक खात्याच्या चेक अथवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.


प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादकतेचा गौरव करणे, त्यांच्या इच्छाशक्ती व मनोबलात वाढ घडवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लावणे तसेच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही मिळून राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडावी, हा या पीकस्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.


#खरीपपीकस्पर्धा #KharifCropCompetition #अहिल्यानगर #Ahilyanagar #कृषीविभाग

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.