Breaking News

जामखेड : लग्नसमारंभात नाव न घेतल्याने वाद; तलाठ्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल

 माईकवर स्वागत करताना नाव न पुकारल्याचा वाद; लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप

जामखेड | प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे एका विवाह सोहळ्यात माईकवर स्वागत करताना नाव न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तलाठ्याने तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अशोक रामचंद्र पठाडे (वय ३७, रा. जवळा) हे जखमी झाले असून याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (११ जुलै) दुपारी मातेश्री मंगल कार्यालयात विवाह सोहळा सुरू असताना अशोक पठाडे हे माईकवरून उपस्थितांचे स्वागत करत होते. यावेळी तलाठी शिवाजी सखाराम हजारे (रा. जवळा) यांनी "माझे नाव माईकवर का घेतले नाही?" असा जाब विचारत वाद घातला. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने अशोक पठाडे यांच्या डोक्यात मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर उपस्थितांनी मध्यस्थी करून वाद शांत केला. जखमी अशोक पठाडे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अशोक पठाडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी सखाराम हजारे यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


#Jamkhed #Rajewadi #CrimeNews #Ahilyanagar #Police #Wedding #MaharashtraNews #ApleSatyaAhilyanagar

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.