Breaking News

पत्रकाराच्या हल्लेखोरांचा अखेर शोध; वाळुंज MIDCमधून तिघांना ताब्यात

 

पत्रकारावर प्राणघातक हल्ला; पसार तीन आरोपी छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; दोन आरोपी सराईत गुन्हेगार

अहिल्यानगर : पत्रकार सुशिल थोरात यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

20 ऑगस्ट रोजी पत्रकार सुशिल मारूतराव थोरात (वय 49, रा. राज्य कर्मचारी सोसायटी, समतानगर, सावेडी, अहिल्यानगर) यांच्या मारुती अल्टो कारला सोनु कोहक याच्या मोपेडची धडक झाली. तसेच थोरात यांनी आरोपींच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून सोनु कोहक, पप्पु मते, विकी ढवण, प्रशांत निक्रड आणि एका अनोळखी व्यक्तीने थोरात व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

यावेळी आरोपींनी थोरात यांना खाली पाडून त्यांच्या डोक्यात आणि पाठीवर दगडाने मारहाण केली. तसेच गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 717/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 109(1), 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 191(2), 191(3) आणि 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान आरोपी राजगुरुनगर आणि पुणे शहर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तेथे शोध घेतला; मात्र आरोपी पोलिसांना चकवा देऊन पसार झाले.

दरम्यान, 24 ऑगस्ट रोजी मुख्य आरोपी हेमंत उर्फ सोनु दत्तात्रय कोहक हा साथीदारांसह छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत हेमंत उर्फ सोनु दत्तात्रय कोहक (27), महेश उर्फ पप्पु दशरथ मते (27) आणि प्रशांत शिवाजी निक्रड (25) या तिघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत त्यांनी पत्रकार सुशिल थोरात आणि त्यांच्या मुलास मारहाण केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

दोन आरोपी सराईत गुन्हेगार

ताब्यातील आरोपींपैकी हेमंत उर्फ सोनु कोहक आणि प्रशांत निक्रड हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

हेमंत कोहक याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात 2022 मध्ये भारतीय दंड विधान कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तर प्रशांत निक्रड याच्यावर 2025 मध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईतील पोलीस पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, संदिप दरवडे तसेच पोलीस अंमलदार संदिप पवार, योगेश भिंगारदिवे, अतुल लोटके, शाहीद शेख, राहुल द्वारके, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सुनिल मालणकर, भगवान थोरात आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.

Tags:
#अहिल्यानगर #पत्रकारावरहल्ला #स्थानिकगुन्हेशाखा #छत्रपतीसंभाजीनगर #अहिल्यानगरपोलीस



No comments

Note: Only a member of this blog may post a comment.