अहिल्यानगर जिल्ह्याला PMFME योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार; 1,855 अन्न प्रक्रिया उद्योगांना मिळाला लाभ
अहिल्यानगर, दि. 25 ऑगस्ट 2026 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)च्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे 24 व 25 ऑगस्ट रोजी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय PMFME कॉन्क्लेव्हमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेला हा पुरस्कार केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी स्वीकारला. यावेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीय सचिव अविनाश जोशी, सहसचिव देवेश देवाल तसेच कृषी संचालक विजयकुमार आवटे उपस्थित होते.
जिल्ह्यात 1,855 अन्न प्रक्रिया उद्योग सुरू
अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 हजार 855 अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा कृषी विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अहिल्यानगरचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.
महाराष्ट्राला या योजनेतील पुरस्कारांच्या वर्गवारीत देशात प्रथम क्रमांक मिळवून देण्यातही अहिल्यानगर जिल्ह्याचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सांगण्यात आले.
सरासरी 11.68 लाखांचे प्रकल्प कर्ज
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सरासरी 11.68 लाख रुपये प्रकल्प कर्ज, तर सरासरी 4.27 लाख रुपये अनुदान मिळाले आहे. जिल्ह्यातील अन्न प्रक्रिया उद्योगांना आतापर्यंत सुमारे 79 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया करणारे व्यावसायिक संघटित क्षेत्रात येत असून, त्यांना बँक कर्ज उपलब्ध होण्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे.
तरुणांसाठी रोजगाराच्या संधी
अन्न प्रक्रिया उद्योगांची उभारणी झाल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. अधिकाधिक उद्योजक तयार करून तरुणांना रोजगाराच्या संधी जिल्ह्यातच उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे सुधाकर बोराळे यांनी सांगितले.
संघभावनेतून मिळाले यश
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व बँका, कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि जिल्हा संसाधन व्यक्तींनी संघभावनेने काम केले. या सामूहिक प्रयत्नांचे फलित म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याने केंद्र शासनाच्या स्तरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे.
#अहिल्यानगर #PMFME #अन्नप्रक्रियाउद्योग #कृषीविभाग #महाराष्ट्र
अहिल्यानगर PMFME पुरस्कार, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, PMFME Maharashtra, अन्न प्रक्रिया उद्योग, अहिल्यानगर कृषी विभाग


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.