Breaking News

अहिल्यानगरच्या शेवगावात मावा तयार करणारा अड्डा उद्ध्वस्त; १८ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

 


शेवगाव : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे बेकायदेशीरपणे मावा तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक मशीनपासून तयार माव्यापर्यंत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.


पोलिसांना शेवगाव शहरातील कोरडे वस्ती परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक मशीनच्या सहाय्याने सुगंधित तंबाखू आणि सुपारीचे मिश्रण करून बेकायदेशीररीत्या मावा तयार केला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.


छाप्यादरम्यान वसीम सत्तार तांबोळी आणि शाहरूख उर्फ जावेद सलीम शेख हे दोघे मशीनच्या सहाय्याने मावा तयार करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.


पोलिसांच्या चौकशीत हा मावा आसिफ रहेमान तांबोळी याच्या सांगण्यावरून तयार केला जात असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.


या कारवाईत पोलिसांनी दोन इलेक्ट्रिक मशीन, ६५ किलो सुगंधित तंबाखू, ८० किलो तयार मावा, ८०० किलो सुपारी चुरा, अतिरिक्त सुगंधित तंबाखू, कलर, दोन वजन काटे तसेच दोन कार असा एकूण १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.




#शेवगाव #अहिल्यानगर #मावा #तंबाखू #CrimeNews




No comments

Note: Only a member of this blog may post a comment.