Breaking News

ASDD यादीतील मतदारांनी 16 ऑगस्टपर्यंत नावाची खात्री करावी

अहिल्यानगर, दि. १२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ नोव्हेंबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र (Enumeration Form) जमा करीत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १२ विधानसभा मतदारसंघांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार असंकलित मतदारांची ASDD (गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार मतदार) यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हा प्रशासनाच्या संबंधित लिंकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मतदारांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ASDD यादीचे अवलोकन करून त्यामध्ये स्वतःचे किंवा कुटुंबातील सदस्याचे नाव आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

ASDD यादीमध्ये नाव आढळल्यास संबंधित मतदारांनी १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना प्रपत्र (Enumeration Form) आपल्या स्थानिक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा तहसील कार्यालयाकडे भरून द्यावे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीमध्ये संबंधित नावाचा समावेश करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करता येणार आहे.

याशिवाय मतदारांना टोल फ्री क्रमांक १९५० वर संपर्क करून मार्गदर्शन घेता येणार आहे. तसेच ECINET मधील Book a Call Request या सुविधेचा वापर करून संबंधित BLO शी संपर्क साधता येईल.

NGSP (National Grievance Service Portal) च्या माध्यमातूनही १६ ऑगस्टपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. प्राप्त अर्जाच्या आधारे संबंधित मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी घेतील.

त्यामुळे ASDD यादीतील मयत, दुबार किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित म्हणून नोंद झालेल्या मतदारांनी १६ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपल्या नावाची खात्री करून आवश्यक असल्यास गणना प्रपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

महत्त्वाची अंतिम तारीख : १६ ऑगस्ट २०२६

अधिकृत माहिती: अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर ASDD मतदार यादी उपलब्ध आहे.


#ASDDमतदारयादी

#मतदारयादीपुनरिक्षण

#अहिल्यानगर

#मतदारनोंदणी

#ElectionCommissionOfIndia

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.