भटके-विमुक्त समाजातील एकाही बालकाचे शिक्षण भटक्या जीवनपद्धतीमुळे थांबू नये : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
पुणे | १ सप्टेंबर २०२६ : भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. या समाजातील कोणत्याही बालकाचे शिक्षण त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीमुळे बाधित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘भटके-विमुक्त दिवस’ राज्यस्तरीय कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.
राज्यपाल वर्मा म्हणाले की, भटके-विमुक्त दिवस हा केवळ एका समाजाच्या इतिहासाची आठवण करून देणारा दिवस नसून अन्यायातून मुक्ती, आत्मसन्मान, अधिकार, शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक प्रतिष्ठेचा संदेश देणारा दिवस आहे. या समाजाच्या विकासासाठी शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि पुनर्कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
भटके-विमुक्त समाजातील कुटुंबे ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्याच परिसरात मुलांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वसतिगृहे, आश्रमशाळा, शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षण, उच्च व व्यावसायिक शिक्षण तसेच संशोधनाच्या संधी वाढविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘स्कूल कनेक्ट’सारखे उपक्रम या प्रक्रियेत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कागदपत्रांसाठी विशेष शिबिरे घेण्याचे आवाहन
स्थिर निवास, जमिनीचे अधिकार, नागरिकत्वाची कागदपत्रे, शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळविताना भटके-विमुक्त समाजाला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन आणि समाजाने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र आणि रेशनकार्ड यांसारखी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
९ लाखांहून अधिक शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण
मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, शासकीय प्रमाणपत्रे, रोजगार, स्वयंरोजगार आणि पायाभूत सुविधांवर शासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.
महसूल विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत ९ लाख २७ हजार ९७३ शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यापुढे वस्तीस्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान केली जाणार असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, भटके-विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, संचालक सोनाली मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
#भटकेविमुक्त #महाराष्ट्रशासन #जिष्णुदेववर्मा #अतुलसावे #शिक्षण #सामाजिकन्याय


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.