Breaking News

मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात; १ लाख २५ हजार रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रमाणपत्रे


ठाणे :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियाना’ची सांगता झाली.

मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा असून अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या १०५ दिवसांच्या अभियानातून मराठी भाषा शिकून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १ लाख २५ हजार रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. हा उपक्रम केवळ समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ हा महाराष्ट्राचा जयघोष असून, मराठीची भक्ती महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे. परिवहन मंत्र्यांनी कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमाने भाषा शिकविण्याचा मार्ग स्वीकारला, हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी शिकणाऱ्या अमराठी बांधवांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीत संवाद साधण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, अभियान समन्वयक सल्लागार डॉ. ज्योती ठाकरे आदी उपस्थित होते.

Tags: #मराठीभाषा #मराठी #महाराष्ट्र #रिक्षाचालक #टॅक्सीचालक

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.