गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेबाबत व्हायरल होत असलेला फोटो दिशाभूल करणारा; तेलंगणातील आठ वर्षांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यासाठी सोशल मीडियावर सध्या एक छायाचित्र मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या छायाचित्रात एका आरोग्य कर्मचाऱ्याकडून रुग्णाला झोळीच्या सहाय्याने दुर्गम भागातून नेले जात असल्याचे दिसत आहे. मात्र, हे छायाचित्र गडचिरोली जिल्ह्यातील असल्याचा दावा चुकीचा असल्याचे तथ्य पडताळणीत समोर आले आहे.
संबंधित छायाचित्राचा गडचिरोलीशी कोणताही संबंध नसून ते तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम येथील आहे. विशेष म्हणजे हे छायाचित्र सध्याचे नसून सुमारे आठ वर्षांपूर्वीचे आहे. १९ जुलै २०१८ रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून हे छायाचित्र प्रसारित करण्यात आले होते.
दुर्गम भागातील आजारी व्यक्तीला आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत त्यावेळी हे छायाचित्र शेअर करण्यात आले होते. तसेच, सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या छायाचित्रामध्ये मूळ छायाचित्राशी डिजिटल फेरफार करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.
त्यामुळे तेलंगणातील जुने छायाचित्र डिजिटल पद्धतीने फेरफार करून ते गडचिरोली जिल्ह्यातील सध्याच्या आरोग्य व्यवस्थेचे असल्याचे भासवणे हे दिशाभूल करणारे आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची तसेच जिल्ह्याबाबत चुकीची प्रतिमा तयार होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी सोशल मीडियावरून मिळणारी कोणतीही माहिती खातरजमा केल्याशिवाय पुढे प्रसारित किंवा फॉरवर्ड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तथ्य पडताळणी : #FactCheck #DGIPRFactCheck
मूळ पोस्ट : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकृत एक्स खाते, १९ जुलै २०१८
#गडचिरोली #FactCheck #DGIPRFactCheck #Maharashtra #HealthNews


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.