रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश; मातृतिर्थ सिंदखेडराजा विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर
मुंबई | प्रतिनिधी : राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील मातृतिर्थ सिंदखेडराजा विकास आराखड्याला अखेर गती मिळाली आहे. आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पूर्वीच्या विकास आराखड्यासाठी पुढील तीन महिन्यांत ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आश्वासनही दिले आहे.
राजमाता जिजाऊ स्मारकाला भेट दिल्यानंतर नगराध्यक्ष सौरभ तायडे, उपनगराध्यक्षा संगीता म्हस्के, माजी उपनगराध्यक्षा दिपाली म्हस्के आणि स्थानिक नागरिकांनी विकास आराखडा पुरातत्त्व विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाकडे प्रलंबित असल्याची माहिती रोहित पवार यांना दिली होती. तसेच १२ जानेवारी २०२७ पर्यंत आराखडा मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यावेळी या आंदोलनाला पाठिंबा देतानाच विकास आराखडा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन रोहित पवार यांनी दिले होते. ज्येष्ठ नेते राजेंद्र शिंगणे यांचेही यासाठी प्रयत्न सुरू होते.
यानंतर रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सिंदखेडराजा विकास आराखड्याची संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. राजमाता जिजाऊंच्या ऐतिहासिक स्मारकाचा विकास तातडीने होणे आवश्यक असल्याचे सांगत आवश्यक सहकार्याची विनंती केली.
यावर त्वरित प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटनमंत्री, बुलढाणा जिल्हाधिकारी, मुख्य सचिव तसेच वित्त व नियोजन विभागातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली. अवघ्या अर्ध्या तासात ५० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देत विकासकामे तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच जुन्या विकास आराखड्यासाठी पुढील तीन महिन्यांत ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या निर्णयाबद्दल रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी हे काम तत्परतेने मार्गी लावल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुनील भुसारा, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार विद्याताई चव्हाण, पंकज नाना बोराडे आणि पंकज मोहोड उपस्थित होते.
#Tags: #रोहितपवार #सिंदखेडराजा #राजमाताजिजाऊ #एकनाथशिंदे #बुलढाणा




No comments
Note: Only a member of this blog may post a comment.