महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटरमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे
२१ ऑगस्ट रोजी राज्यभर आयोजन; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
मुंबई | दि. १७ ऑगस्ट : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये "महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर" या जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची "Save Soil, Save Water, Secure Tomorrow" ही थीम असून "पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा" हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत कमाल तीन किलोमीटर वॉक आणि मृद व जलसंधारणाची शपथ असा कार्यक्रमाचा मुख्य भाग असणार आहे.
मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, खेळाडू, विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी, लायन्स क्लब, रनिंग व सायकलिंग क्लब, उद्योग व व्यापारी संघटना तसेच सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.
या महा वॉकेथॉनसाठी क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा सन्मान करण्यात येईल.
प्रत्येक जिल्ह्यात प्रायोजकांच्या माध्यमातून एकूण ७१ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये:
- प्रथम पुरस्कार – ₹२५,००० व गौरवचिन्ह
- द्वितीय पुरस्कार – ₹१५,००० व गौरवचिन्ह
- तृतीय पुरस्कार – ₹१०,००० व गौरवचिन्ह
याशिवाय प्रत्यक्ष सहभागींपैकी ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात जणांना प्रत्येकी ₹३,००० रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.
सोशल मीडियावर या उपक्रमाचा प्रचार करताना #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहनही मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
— समाप्त —
Tags: #MahaWalkathon #WalkForWater #SaveSoilSaveWater #जलसंधारण #मृदसंधारण


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.