सांगलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; दीड कोटींचा गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा जप्त
सांगली | प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धाड टाकत तब्बल ₹1 कोटी 50 लाख किमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत 1,200 बॉक्समधील 10,368 विदेशी मद्याच्या बाटल्या, एक मालवाहू ट्रक आणि चालकाचा मोबाईल असा एकूण दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी ट्रक चालक सहिराम पोकरराम बिश्नोई (वय 42, रा. जोधपूर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ईश्वरपूर येथील निरीक्षक तानाजी कदम यांना या तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस महामार्गावर पाळत ठेवली. शनिवारी सायंकाळी सुमारे 6 वाजता पेठ येथील महामार्गावरील एका हॉटेलजवळ संशयित KA-20 AB-3867 क्रमांकाचा ट्रक अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा आढळून आला.
प्राथमिक तपासात तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रकची नंबर प्लेट बदलण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बनावट ओळख वापरून आंतरराज्य मद्य तस्करीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा मद्यसाठा अन्य राज्यात पाठविण्याच्या तयारीत असल्याची माहिती असून, या कारवाईमुळे मोठे तस्करीचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
#SangliNews #ExciseDepartment #LiquorSmuggling #CrimeNews #MaharashtraNews


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.