नवी मुंबईत ‘मेघालय सदना’चे भूमिपूजन; महाराष्ट्र-मेघालयचे सांस्कृतिक व आर्थिक नाते अधिक दृढ होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा
खारघर, नवी मुंबई : महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील मेघालय या दोन राज्यांमधील सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. खारघर, नवी मुंबई येथील प्लॉट क्रमांक १४, सेक्टर १६ येथे ‘मेघालय सदना’साठी जमीन हस्तांतरण आणि भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि मेघालय ही केवळ दोन राज्ये नसून, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारी सहोदर राज्ये असल्याचे सांगितले. मेघालय सदनाच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमधील नागरिक, विद्यार्थी, उद्योजक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. तसेच महाराष्ट्र आणि मेघालयमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांना यामुळे नवी चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी मेघालय भवनासाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. महाराष्ट्रात शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि इतर कारणांसाठी वास्तव्यास असलेल्या मेघालयातील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी हे सदन महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मेघालय सदना’मुळे महाराष्ट्रात येणाऱ्या मेघालयातील नागरिकांना निवास, प्रशासकीय समन्वय आणि विविध शासकीय कामांसाठी सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर मेघालयची संस्कृती, परंपरा आणि पर्यटनाची ओळख महाराष्ट्रात अधिक व्यापक करण्यासाठीही या केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला मेघालयचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग, मेघालयचे सामान्य प्रशासन विभाग मंत्री सोस्थेनिस सोहतुन, खासदार मिलिंद देवरा, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मेघालयचे मुख्य सचिव शकील अहमद, सामान्य प्रशासन विभागाचे आयुक्त व सचिव सिरिल व्ही. डी. डिएंगडोह, पनवेलचे महापौर नितीन पाटील, कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सिडकोचे मुख्य महाव्यवस्थापक अश्विन मुद्गल, सिडकोचे सहव्यवस्थापक राजा दयानिधी आणि गणेश देशमुख उपस्थित होते.
तसेच पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, पनवेल प्रांताधिकारी पवन चांडक, तहसीलदार मिनल भामरे यांच्यासह महाराष्ट्रात वास्तव्यास असलेले मेघालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘मेघालय सदना’च्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मेघालयमधील परस्पर सहकार्याला संस्थात्मक स्वरूप मिळण्यास मदत होणार असून, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेला आणखी बळ मिळणार आहे.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.