Breaking News

नमो शेतकरी योजनेचा ९वा हप्ता अद्याप प्रलंबित; सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर, मग शेतकऱ्यांचे पैसे कधी? लाभार्थ्यांचा संतप्त सवाल

 



अहिल्यानगर | प्रतिनिधी

राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ९व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, अद्यापही हप्ता जमा न झाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. खरीप हंगाम सुरू असताना बियाणे, खते, औषधे आणि शेतीच्या इतर खर्चासाठी पैशांची गरज असताना हप्ता रखडल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला नियोजित वेळेत त्यांच्या खात्यात जमा होत असताना, शेतकरी कल्याणासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनांचे हप्ते मात्र वारंवार उशिराने मिळत असल्याने लाभार्थी शेतकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.

"सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळते, मग शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेचा ९वा हप्ता वेळेवर का मिळत नाही?" असा सवाल राज्यभरातील अनेक शेतकरी सोशल मीडियासह विविध माध्यमांतून उपस्थित करत आहेत.

याबाबत राज्य शासनाकडून ९व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम असून, शासनाने तातडीने अधिकृत घोषणा करून प्रलंबित हप्ता वितरित करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकरी सन्मान योजनांचे हप्ते निश्चित वेळापत्रकानुसार वितरित करण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी.

शासनाने यासंदर्भात लवकर निर्णय घेऊन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ९वा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशी राज्यभरातून मागणी होत आहे.

– आपलं सत्य अहिल्यानगर विश्वासार्ह, अचूक आणि जनहिताची बातमी.

#नमोशेतकरीयोजना

#९वाहप्ता

#शेतकरीबातमी

#महाराष्ट्रशेतकरी

#आपलंसत्यअहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.