पुणे-मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक गतिमान करण्याचे निर्देश; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा भर
मुंबई, दि. ४ ऑगस्ट २०२६: पुणे व मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाप्रीत यांच्या माध्यमातून योजना प्रभावीपणे राबविण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री **** यांनी दिले.
यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीस पुणे महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव चंद्रशेखर तरंगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पुणे व मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत योजनांच्या प्रभावी नियोजनासाठी सल्लागार संस्था निश्चित करणे, सुरू असलेल्या प्रकल्पांचे सर्वेक्षण, क्षेत्रनिहाय तपशीलांचे परीक्षण, क्षेत्र दुरुस्ती, दृश्य पडताळणी तसेच विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक आणि वेगवान करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी, म्हाडा तसेच संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय राखण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक सर्वेक्षण पूर्ण करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा आणि विकासकामे निश्चित कालमर्यादेत प्रभावीपणे पूर्ण होतील, यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मुख्य मुद्दे:
- झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यावर भर.
- प्रायोगिक तत्त्वावर महाप्रीत व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी.
- सर्वेक्षण, तांत्रिक पडताळणी आणि क्षेत्रनिहाय परीक्षणाला प्राधान्य.
- संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्याच्या सूचना.
- विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.