Breaking News

नागपंचमीच्या आखाड्यात रंगला कुस्तीचा थरार; रिवराज चव्हाण ठरला मानकरी

 



जामखेड प्रतिनिधी : नागपंचमीच्या यात्रेनिमित्त जामखेड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या आखाड्यात मल्लांनी दमदार डावपेच सादर करत उपस्थित कुस्तीप्रेमींची मने जिंकली. महाराष्ट्राच्या परंपरागत कुस्ती संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी आखाड्यात गर्दी केली होती.

कै. विष्णू उस्ताद काशीद बाबा प्रतिष्ठानच्या वतीने तसेच अजय दादा काशीद मित्र परिवाराच्या आयोजनातून जामखेड महाविद्यालयाच्या मैदानावर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र केसरी पैलवानांसह नामांकित मल्लांच्या उपस्थितीमुळे आखाड्यात चांगलीच रंगत निर्माण झाली.

या कुस्ती स्पर्धेत मैदानातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेली माणची पहिली कुस्ती पै. रिवराज चव्हाण आणि आंतरराष्ट्रीय आखाडा भूषण आप्पा पै. महादेव ककडे यांच्यात झाली. दोन्ही मल्लांनी सुरुवातीपासूनच सावध आणि आक्रमक खेळ करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. अखेर रिवराज चव्हाण याने संधी साधत प्रतिस्पर्ध्यावर डाव टाकून विजय मिळवला.

रिवराज चव्हाण यांच्या या विजयानंतर त्यांचा मानकरी म्हणून गौरव करण्यात आला. त्यांच्या विजयी कामगिरीचे उपस्थित मान्यवर आणि कुस्तीप्रेमींनी कौतुक केले.

यावेळी राम शिंदे यांच्या राजकीय वक्तव्यानेही कार्यक्रमाला वेगळे वळण मिळाले. कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय टोले लागल्याने उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले. माजी मंत्री राम शिंदे यांनी कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय भाष्य केल्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.

दरम्यान, कुस्ती मैदानावर उपस्थित मल्लांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरवही यावेळी करण्यात आला.

जामखेडच्या नागपंचमी यात्रेला पारंपरिक कुस्तीची मोठी परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित होणाऱ्या या कुस्ती आखाड्याला यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नामांकित मल्लांच्या उपस्थितीमुळे जामखेडच्या नागपंचमी कुस्ती आखाड्याची नवी ओळख निर्माण झाली असून, राज्यातील कुस्तीप्रेमींचे लक्ष या आखाड्याकडे वेधले गेले आहे.

#जामखेड #नागपंचमी #कुस्ती #रिवराजचव्हाण #अहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.