जामखेड ते सारोळा ७ किमी रनिंग; पोलिस भरती प्रशिक्षणार्थींनी विद्यार्थ्यांना दिले व्यायामाचे धडे
जामखेड : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ६० प्रशिक्षणार्थींनी शनिवारी (२२ ऑगस्ट) जामखेड ते सारोळा असा तब्बल ७ किलोमीटरचा रनिंग उपक्रम पूर्ण करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सारोळा येथे विद्यार्थ्यांना व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि पोलिस भरतीच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमात प्रा. मोहिते ए. डी. (क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक, जामखेड महाविद्यालय) आणि श्री. साळुंके पी. डी. (क्रीडा शिक्षक, ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड) यांच्या मार्गदर्शनाखाली ६० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.
शाळेत पोहोचल्यानंतर प्रशिक्षणार्थींनी विद्यार्थ्यांना विविध शारीरिक हालचाली, वॉर्म-अप, कूल-डाऊन अॅक्टिव्हिटी आणि विविध व्यायामांचे प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर पोलिस भरतीसाठी आवश्यक शारीरिक तयारी, नियमित व्यायाम, अभ्यासाचे नियोजन आणि तंदुरुस्ती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमावेळी प्रा. मोहिते सर आणि श्री. साळुंके सर यांचा सारोळा गावचे सरपंच श्री. अजयदादा काशिद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.
यानंतर ६० प्रशिक्षणार्थींनी शाळेतील विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवर, प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी सोयाबीन व विविध भाज्यांनी युक्त मसालेभात तसेच केळीची मेजवानी देण्यात आली. स्नेहपूर्ण वातावरणात या उपक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास प्रा. श्री. आण्णा मोहिते, श्री. प्रल्हाद साळुंके, सरपंच श्री. अजयदादा काशिद, मुख्याध्यापक श्री. संदिप भालसिंग, पदवीधर शिक्षक श्री. सुरेश बर्वे, श्री. राहुल लिमकर, उपाध्यापक श्री. प्रशांत होळकर, उपाध्यापिका सौ. शबाना शेख, सौ. वृषाली खांदवे, सौ. अमृता रसाळ, ६० प्रशिक्षणार्थी तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच त्यांच्या मनात सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.
Tags:
#जामखेड #सारोळा #पोलीसभरती #पोलिसभरतीप्रशिक्षण #अहिल्यानगर



No comments
Note: Only a member of this blog may post a comment.