खर्डा पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; ५१.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
खर्डा पोलिसांनी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ४१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी सुपारी तसेच १० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो यांचा समावेश आहे.
सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. धाराशिवकडून बीडकडे शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरून आयशर टेम्पोमधून हा माल नेला जाणार असल्याचे समजले.
माहितीच्या आधारे पोलिसांनी जातेगाव फाटा, खर्डा येथे नाकाबंदी केली. संशयित टेम्पो दिसताच पोलिसांनी तो थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहन न थांबवता बीडच्या दिशेने वेगाने पळ काढला.
पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. अखेर तेलंगशी गावच्या शिवारात संशयित आयशर टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला. वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधी सुपारी आढळून आली.
या प्रकरणी राजु मेहबुब शेख (रा. भेंडटाकळी, ता. गेवराई, जि. बीड), प्रदीप विष्णू गायकवाड (रा. च-हाटा फाटा, ता. जि. बीड) आणि तुषार नामदेव कुसळकर (रा. बीड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांसह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि SDPO सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर आणि पोलीस पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करीत आहेत.
#खर्डापोलिस #गुटखाबंदी #गुटखाजप्त #अहिल्यानगर #पोलीसकारवाई



No comments
Note: Only a member of this blog may post a comment.