१८ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या १२ वर्षीय मुलीचा शोध लागला; दोन जण ताब्यात
अहिल्यानगर : कोपरगाव येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर शहरातील दरेवाडी परिसरातून सुखरूप सुटका केली. या प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपासासाठी त्यांना कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कोपरगाव येथील निलेश भारत चावरे यांची १२ वर्षीय मुलगी १८ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक तयार केले. पथकाकडून समांतर तपास सुरू असताना २१ ऑगस्ट रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मुलगी हरीमळा, दरेवाडी, सोलापूर रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करून मुलीची सुखरूप सुटका केली. यावेळी नूर राजू पठाण (वय १९, रा. आंबेडकरनगर, राहाता) याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत कोपरगावहून अहिल्यानगरला येण्यासाठी समीर मनोज सोनगत (वय २२, रा. हरीमळा, दरेवाडी) याने मदत केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी समीर सोनगत यालाही ताब्यात घेतले.
दोन्ही संशयितांना अल्पवयीन मुलीसह पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, अशोक लिपणे, आजिनाथ पाखरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, अभिजीत आरकल, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे आणि किरण ठुबे यांच्या पथकाने केली.
#अहिल्यानगर #कोपरगाव #स्थानिकगुन्हेशाखा #पोलीसकारवाई #अल्पवयीनमुलगी


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.