महाराष्ट्रातील २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी; गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यात विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून दृष्टीदोष असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत नंबरचे चष्मे उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत सोमवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशनचे संचालक वेणू अंबाती यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
२० लाख विद्यार्थ्यांची होणार तपासणी
या प्रकल्पांतर्गत राज्यातील शासकीय शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभाग प्रकल्पाची अंमलबजावणी करणार असून रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रकल्प अंमलबजावणी भागीदार म्हणून काम करणार आहे. वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन तांत्रिक भागीदार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.
तपासणीत दृष्टीदोष आढळलेल्या पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
३६ महिन्यांत राज्यभर तपासणी शिबिरे
या सामंजस्य कराराचा कालावधी ३६ महिने असून या काळात राज्यभर डोळे तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. प्रकल्पाच्या प्रगतीचे नियमित परीक्षण व मूल्यमापन करण्यात येईल. त्यासाठी त्रैमासिक प्रगती अहवाल तयार करून तपासणी शिबिरांची संख्या, तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि चष्मे वितरित केलेल्या लाभार्थ्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती वैज्ञानिक पद्धतीने संकलित केली जाणार असून, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी गोपनीयता आणि डेटा संरक्षणाच्या तरतुदींवरही विशेष भर देण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोष वेळेत ओळखण्यास तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक दृष्टीसहाय्य उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार आहे.
#शालेयशिक्षण #विद्यार्थी #डोळ्यांची_तपासणी #मोफत_चष्मे #महाराष्ट्र


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.