Breaking News

VB-GRAMG योजनेच्या अंमलबजावणीचा मंत्री भरत गोगावले यांनी घेतला आढावा

 

नियोजन, मागणीनुसार रोजगार आणि E-KYC पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश


अहिल्यानगर, दि. २६ ऑगस्ट २०२६ : विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अर्थात VB-GRAMG योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर नियोजन, मजुरांना मागणीनुसार रोजगार आणि सर्व मजुरांचे E-KYC पूर्ण करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.


मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली VB-GRAMG योजनेच्या अंमलबजावणीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यातील योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्वाधिक कामे सुरू असलेल्या ११ जिल्ह्यांच्या प्रगतीचा आलेख सादर करण्यात आला.


बैठकीत ग्रामपंचायतनिहाय कामांची प्रगती, निर्माण झालेले मनुष्यदिवस तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली.


नंदुरबार, अहिल्यानगर, यवतमाळ, नाशिक आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचे मंत्री गोगावले यांनी कौतुक केले. या जिल्ह्यांनी अवलंबलेल्या प्रभावी कार्यपद्धतीचा इतर जिल्ह्यांनीही अभ्यास करून त्याच धर्तीवर नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले.


ग्रामपंचायतनिहाय पंचवार्षिक आराखडा तयार करण्याचे निर्देश


ग्रामपंचायत स्तरावर विकसित ग्रामपंचायत प्लॅन आणि पंचवार्षिक आराखडा तयार करून ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.


मजुरांना मागणीनुसार वेळेत काम उपलब्ध व्हावे यासाठी पुरेसा Shelf of Works तयार ठेवण्यावरही भर देण्यात आला. तसेच सर्व मजुरांचे E-KYC प्राधान्याने पूर्ण करून जास्तीत जास्त मजुरांना त्यांच्या मागणीनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.


योजनेअंतर्गत नियोजनबद्ध ग्रामविकास, मागणीनुसार रोजगार आणि पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन मंत्री गोगावले यांनी केले.


बैठकीस रोहयो विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज, आयुक्त अनिता मेश्राम, सहसचिव अतुल कोदे, कैलास साळुंके, सहआयुक्त डॉ. विवेक घोडके यांच्यासह रोहयो विभागातील वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते










No comments

Note: Only a member of this blog may post a comment.