ग्रामपंचायतींमध्ये माहितीच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करा ११ जानेवारी २००८च्या शासन परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची दीपक पाचपुते यांची मागणी
अहिल्यानगर प्रतिनिधी : प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ची ग्रामपंचायत स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ११ जानेवारी २००८ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकातील निर्देशांची जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी दीपक पाचपुते यांनी केली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना माहितीचा अधिकार कायद्याचा वापर सुलभपणे करता यावा, यासाठी शासन परिपत्रकात विविध निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामसभेच्या विषयसूचीत माहितीच्या अधिकाराचा विषय कायमस्वरूपी समाविष्ट करणे तसेच ग्रामपंचायतीकडे प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या अर्जांची संख्या, निकाली काढलेले अर्ज आणि प्रलंबित अर्ज याबाबत ग्रामसभेत चर्चा करण्याच्या सूचनांचा त्यात समावेश आहे.
यासोबतच ग्रामसेवकांना माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत आवश्यक प्रशिक्षण देणे, जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपील प्राधिकाऱ्यांची माहिती नागरिकांना स्पष्टपणे उपलब्ध करून देणे, तसेच प्रथम अपीलच्या प्रकरणांमध्ये संबंधित अपीलकर्त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी देणे, याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.
माहितीचा अधिकार अधिनियमातील कलम ४(१)(ख) अंतर्गत ग्रामपंचायतीने स्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती नियमितपणे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात जनमाहिती अधिकारी, प्रथम अपील प्राधिकारी, कलम ४(१)(ख) अंतर्गत प्रसिद्ध करावयाची माहिती तसेच अर्ज व अपील प्रक्रियेबाबतची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये संबंधित शासन परिपत्रकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे का, याची जिल्हा परिषद स्तरावर तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून अनुपालन अहवाल मागवून आढळणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन माहितीचा अधिकार कायदा अधिक नागरिकाभिमुख करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ही मागणी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरोधात नसून, शासनाच्या विद्यमान निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होऊन नागरिकांना पारदर्शक, उत्तरदायी आणि माहिती सहज उपलब्ध होणारे प्रशासन मिळावे, या जनहिताच्या उद्देशाने करण्यात आली असल्याचे दीपक पाचपुते यांनी स्पष्ट केले.
जामखेड हिंदी मराठी पत्रकार तालुका संघटक रवी कुमार शिंदे
#माहितीचाअधिकार #ग्रामपंचायत #अहिल्यानगर #दीपकपाचपुते #आपलंसत्यअहिल्यानगर #पत्रकाररवीकुमारशिंदे

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.