फायरिंगसह कोयता-चाकूने प्राणघातक हल्ला; तिघे जेरबंद!
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; वाळुंजसह नेवासा परिसरातून आरोपी ताब्यात
अहिल्यानगर | दि. ११ ऑक्टोबर २०२६
नेवासा : नेवासा तालुक्यातील नागफनी येथील साईनाथनगर परिसरात घरात घुसून गोळीबारासह कोयता, चाकू, कुऱ्हाड आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. उमेश हरिसिंग भोसले, आकाश गौतम चव्हाण आणि कुणाल कल्याण चव्हाण अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयातून हल्ला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास रमेश छगन भोसले हे नागफनी येथील त्यांच्या घरी असताना आरोपींनी घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. ‘पोलिसांना माहिती देतो का?’ असे म्हणत आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या घटनेत अभिषेक कल्याण चव्हाण याने बंदुकीतून रमेश भोसले यांच्या पाठीत गोळी झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच कुणाल चव्हाण याने कोयत्याने, आकाश चव्हाण याने चाकूने, तर गणेश चव्हाण आणि उमेश भोसले यांनी कुऱ्हाडीने डोके, हात, पोट व पायावर वार केल्याचा आरोप आहे. इतर आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचेही पोलिसांनी सांगितले.
नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ११८(१), ११५(२), १८९(२), १९० तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळुंजमध्ये दोघे, नेवासा परिसरातून एकाला पकडले
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज येथे कारवाई करून उमेश हरिसिंग भोसले (वय २८) आणि आकाश गौतम चव्हाण (वय २०) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर नेवासा परिसरातून कुणाल कल्याण चव्हाण (वय ३४) यालाही ताब्यात घेण्यात आले.
तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी नेवासा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.
उमेश भोसलेविरुद्ध यापूर्वीही गुन्हे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश हरिसिंग भोसले हा सराईत आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध वाळुंज पोलीस ठाण्यात सन २०२३ मध्ये भारतीय दंड विधान कलम ३९२ अंतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी ही कारवाई केली.
संपादक: रवीकुमार शिंदे | आपलं सत्य अहिल्यानगर | ऑल इंडिया आरटीआय न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर | भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव | हिंदी मराठी पत्रकार संघ तालुका संघटक जामखेड
#अहिल्यानगर #नेवासा #फायरिंग #स्थानिकगुन्हेशाखा #नेवासा_पोलीस #CrimeNews #MaharashtraPolice #आपलंसत्यअहिल्यानगर


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.