Breaking News

पाण्याच्या बाटलीपासून हॉटेलच्या बिलापर्यंत ग्राहकांची लूट रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 


अहिल्यानगर : बसस्थानक, हॉटेल, दुकाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये ग्राहकांकडून छापील कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (MRP) अधिक रक्कम आकारणे, तसेच हॉटेलच्या बिलामध्ये पूर्वसंमतीशिवाय सर्व्हिस चार्ज आकारण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हास्तरीय तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण योद्धा दीपक पाचपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


पाण्याच्या बाटलीवर छापील किंमत ₹१५ असताना ग्राहकांकडून ₹२० आकारणे, कूलिंग चार्जच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम घेणे, तसेच हॉटेलच्या बिलामध्ये अनिवार्य स्वरूपात सर्व्हिस चार्ज आकारणे, अशा प्रकारांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती आणि प्रभावी तपासणी आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


ग्राहक संरक्षण कायदा २०१९ आणि Legal Metrology Act 2009 मधील लागू तरतुदींनुसार अशा प्रकरणांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


जिल्ह्यातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना ग्राहक हक्क आणि संबंधित नियमांबाबत मार्गदर्शन करावे, संबंधित विभागांमार्फत नियमित तपासणी करावी तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.


दरम्यान, ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून तक्रारी असल्यास राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक १९१५ किंवा consumerhelpline.gov.in या माध्यमातून तक्रार नोंदवावी, असे आवाहन दीपक पाचपुते यांनी केले आहे.


रवीकुमार शिंदे

आपलं सत्य अहिल्यानगर

#ग्राहकसंरक्षण #ग्राहकहक्क #MRP #अहिल्यानगर #हॉटेलबिल #सर्व्हिसचार्ज #जागोग्राहकजागो #ग्राहकतक्रार #रवीकुमारशिंदे #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.