Breaking News

संगमनेर तालुक्यात टंचाई आढावा बैठक संपन्न “मुख्यालयात राहून नागरिकांना योजनांचा लाभ द्या; शेतकऱ्यांना विश्वास द्या” — पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

 


संगमनेर | प्रतिनिधी

टंचाईच्या काळात कृषी, पशुसंवर्धन, ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या तालुकास्तरीय यंत्रणेने मुख्यालयात उपस्थित राहून प्रत्यक्ष क्षेत्रभेटी कराव्यात. शेतकरी व नागरिकांना पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस आमदार अमोल खताळ, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधीर बोराळे, संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह पशुसंवर्धन व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पीक विमा आणि पंचनाम्याबाबत निष्काळजीपणा नको

पीक विम्याच्या बाबतीत कोणतीही टाळाटाळ किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. पिकांचे १०० टक्के पंचनामे पूर्ण करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता ग्रामविकास आणि महसूल विभागाने घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

अधिकाऱ्यांची मुख्यालयातील उपस्थिती अनिवार्य

कृषी, पशुसंवर्धन आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्यालयात थांबून प्रत्यक्ष स्थळभेटी घ्याव्यात. स्थानिक परिस्थितीची माहिती घेऊन नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

पशुधनासाठी आवश्यक असलेल्या चारा डेपोची गरज तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता असलेल्या गावांचे सर्वेक्षण करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आठ गावे आणि १६ वाड्यांना टँकरने पाणी

संगमनेर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती, पशुधनासाठी राखीव चारा आणि जलसंपदा विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला.

सद्यस्थितीत तालुक्यातील आठ गावे आणि १६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील टंचाईचा सामना करण्यासाठी प्रत्येक गावाला महिनानिहाय किती पाण्याची आवश्यकता आहे, याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

जल जीवन मिशनच्या योजनांना प्राधान्य

जल जीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या मालदांड, जोरवे, वरवंडी, पाचगाव, निमोण यांसह अन्य गावांच्या पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

संगमनेर शहरातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणीपुरवठ्यात दूषित पाणी मिसळत असल्याच्या तक्रारीचीही गंभीर दखल घेण्यात आली. नगरपालिका व मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच पाण्याच्या पुनर्वापराबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.

भोजापूर प्रकल्पाच्या भूसंपादनाचा आढावा

भोजापूर प्रकल्पाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाबाबत सर्वेक्षण करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला देण्यात आले.

वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश

महावितरणने वीजपुरवठा खंडित होण्याचा कालावधी कमी करावा. नादुरुस्त डीपी आणि ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्याची कार्यवाही करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळेल, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही

आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यातील सर्व शेतीचे पंचनामे विनाविलंब पूर्ण करण्याची मागणी केली. वीजपुरवठा, चारा उपलब्धता आणि पीक विम्यापासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी महसूल व कृषी विभागाने दक्षता घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी टँकर, चारा-बियाणे आणि नुकसानभरपाईसंदर्भातील विविध मागण्या मांडल्या. या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

— पत्रकार : रवी कुमार शिंदे
आपलं सत्य अहिल्यानगर

#संगमनेर #राधाकृष्णविखेपाटील #अमोलखताळ #पाणीटंचाई #शेतकरी #पीकविमा #पीकपंचनामा #टँकरपाणीपुरवठा #चारा #जलजीवनमिशन #भोजापूरप्रकल्प #महावितरण #अहिल्यानगर #आपलंसत्यअहिल्यानगर


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.