राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम; ‘चला शाळेत जाऊ या’ उपक्रम राबविणार!
‘माझी शाळा-माझी जबाबदारी’ या भावनेतून शाळांचे सुशोभीकरण; शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा सहभाग
मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘चला शाळेत जाऊ या... विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शाळा परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आनंददायी बनविण्यासह विद्यार्थ्यांसाठी अधिक पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
शालेय शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. या मोहिमेत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून शाळांची स्वच्छता, सुशोभीकरण आणि देखभाल केली जाणार आहे.
स्वच्छतेसोबत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव
शाळा परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी, पर्यावरण संवर्धन, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जबाबदारी आणि शिस्तीची भावना रुजविण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे. समग्र शिक्षा योजनेंतर्गत शाळांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांनाही या उपक्रमामुळे चालना मिळणार आहे.
मुख्याध्यापकांवर अंमलबजावणीची जबाबदारी
‘माझी शाळा-माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून मोहिमेत लोकसहभाग वाढविण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच उपलब्धतेनुसार सीएसआर आणि स्थानिक सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे.
मोहिमेची शाळास्तरीय अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर राहणार आहे. लोकसहभागातून शाळांचे वातावरण अधिक स्वच्छ, सुंदर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
शासनाचे अधिकृत परिपत्रक :
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202610161449321649.pdf
आपलं सत्य अहिल्यानगर | सत्य, विश्वास आणि जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता
#चला_शाळेत_जाऊ_या #शालेयस्वच्छतामोहीम #महाराष्ट्रशासन #शालेयशिक्षण #अहिल्यानगर



No comments
Note: Only a member of this blog may post a comment.