Breaking News

अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी CSR कंपन्यांनी पुढाकार घ्यावा

 


स्वयंसेवी संस्था, फाउंडेशन, उद्योजक व दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाई तसेच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजनांना सुरुवात केली आहे. नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना पूरक म्हणून CSR कंपन्या, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, फाउंडेशन, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींनी स्वेच्छेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

पाणीपुरवठ्यासह जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य

पाणीटंचाई निवारणासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलसंधारणाची कामे, नाला खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, शेततळी व पाणीसाठवण संरचना निर्माण करणे, विहीर पुनर्भरण आणि जलपुनर्भरण यांसारख्या कामांसाठी सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्ध करून देणे, दुष्काळामुळे प्रभावित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देणे तसेच आरोग्यविषयक मदत उपलब्ध करून देणे, अशा विविध क्षेत्रांतही मदतीची गरज आहे.

गावनिहाय गरजेनुसार मदतीचे नियोजन

गावपातळीवरील पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्थानिक गरजेनुसार मदत उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. प्रत्यक्ष गरज, टंचाईची तीव्रता आणि प्रशासकीय समन्वय यांचा विचार करून मदतीचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे.

CSR आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या प्रयत्नांना बळ मिळण्याबरोबरच संभाव्य दुष्काळाच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यास मदत होणार आहे.

सामाजिक कार्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य

अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक कार्य करू इच्छिणाऱ्या CSR कंपन्या, स्वयंसेवी संस्था, फाउंडेशन आणि देणगीदारांना जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार आहे.

संबंधित कामांसाठी आवश्यक परवानग्या, शासकीय विभागांशी समन्वय, गावनिहाय गरजा, टंचाईग्रस्त भाग आणि लाभार्थ्यांशी संबंधित आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावरून मदत केली जाणार आहे.

इच्छुकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

इच्छुक संस्था व कंपन्यांनी कोणत्या स्वरूपात मदत करू इच्छितात, प्रस्तावित मदतीचे तपशील, अंदाजित निधी किंवा साहित्याचे प्रमाण, मदतीचे कार्यक्षेत्र आणि संपर्क व्यक्तीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : 7972889983
ई-मेल : csr.support.ahilyanagar@gmail.com

जिल्ह्यातील नागरिकांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी तसेच दुष्काळाच्या संभाव्य परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी CSR कंपन्या, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, फाउंडेशन, देणगीदार आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.


आपलं सत्य अहिल्यानगर
मुख्य संपादक : रवीकुमार शिंदे
सत्याच्या शोधात… शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज!

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.