Breaking News

महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा १,८३५ कोटींचा निधी २४व्या हप्त्याचे थेट वितरण; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, सिंचन व पशुपालनावर भर

 


अहिल्यानगर | प्रतिनिधी


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २४व्या हप्त्यापोटी महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत १ हजार ८३५ कोटी रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला. गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात आले.


शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, सिंचन, पशुपालन आणि पूरक व्यवसायांना प्राधान्य दिले जात असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थान येथून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग घेतला. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग यावेळी उपस्थित होते.


प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांना ५० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली किंवा त्यांच्या खर्चात बचत झाली आहे. देशातील ८५ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या लहान शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यांत देण्यात आले आहेत.


जागतिक बाजारात खतांच्या किमती वाढल्यानंतरही त्याचा भार शेतकऱ्यांवर पडू नये यासाठी सरकारने सुमारे १६ लाख कोटी रुपये खर्च केले. गेल्या १२ वर्षांत गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून २४ लाख कोटी रुपये देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांना २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक भरपाई मिळाल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी नमूद केले.


सिंचनावरील खर्च कमी करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १२ लाख सौरपंप देण्यात आले आहेत. या पंपांमुळे शेतकऱ्यांची ८० कोटी लिटरपेक्षा अधिक डिझेलची बचत झाली आहे.


बदलत्या हवामानाशी सुसंगत बियाण्यांच्या सुमारे ३ हजार नव्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रीय गोकुळ अभियानातून देशी पशुधनाचे संवर्धन आणि वैज्ञानिक प्रजननाला चालना दिली जात आहे.


पशूंना लाळ्या-खुरकुत रोगापासून वाचविण्यासाठी देशभर मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून आतापर्यंत सुमारे १५० कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. याचा ८ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पशुधनाला लाभ झाला आहे.


देशातील गाय आणि म्हशींचे प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन २०१३-१४ मधील पाच लिटरपेक्षा कमी पातळीवरून आता सुमारे आठ लिटरपर्यंत वाढले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


रवीकुमार शिंदे

आपलं सत्य अहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.