अहिल्यानगर जिल्ह्यात ५२ हजार ६६० कामांचे नियोजन; मजुरांच्या हाताला मिळणार काम! ‘मागेल त्याला काम’साठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू; रोजगाराची मागणी करण्यासाठी ८६६६९ १७९१३ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
जामखेड प्रतिनिधी
अहिल्यानगर : अपुऱ्या पावसामुळे राज्य शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठे नियोजन केले आहे. जिल्ह्यात तब्बल ५२ हजार ६६० विविध विकासकामे शेल्फवर घेण्यात आली आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम मिळण्यासोबतच गावांच्या विकासालाही गती मिळणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.बी.जी. राम.जी. योजनेअंतर्गत विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेत जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविकेसाठी आवश्यक सुविधा तसेच आपत्ती निवारण आणि हवामान बदलाशी संबंधित अशा चार प्रमुख प्रवर्गांतील कामांचा समावेश आहे. याअंतर्गत एकूण ३७५ प्रकारची विकासकामे मंजूर करता येणार आहेत.
जलसंधारण, चारा निर्मिती, फळबाग लागवड, वृक्षलागवड, पाणंद रस्ते, घरकुल आणि सिंचन विहिरी अशा विविध कामांतून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
‘मागेल त्याला काम’साठी स्वतंत्र मदत कक्ष
दुष्काळी परिस्थितीत कोणताही मजूर रोजगारापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘मागेल त्याला काम’ हे उद्दिष्ट ठेवले आहे. रोजगाराची मागणी करणाऱ्या मजुरांना तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
हेल्पलाईन क्रमांक : ८६६६९ १७९१३
या क्रमांकावर संपर्क साधून व्ही.बी.जी. राम.जी. योजनेअंतर्गत रोजगाराची मागणी नोंदविता येणार आहे. त्यानंतर संबंधित मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येणार आहे.
१,३२४ ग्रामपंचायतींमध्ये रोजगाराची कामे उपलब्ध
अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण १ हजार ३२४ ग्रामपंचायती असून, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. जॉबकार्डधारक मजुराने कामाची मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. निर्धारित कालावधीत काम उपलब्ध न झाल्यास बेरोजगार भत्ता देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून १२५ दिवसांच्या रोजगारासाठी, तर वर्षातील उर्वरित दिवसांच्या रोजगारासाठी राज्य शासनाकडून डीबीटी प्रणालीद्वारे निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मजुरांच्या कामाची मजुरी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. तसेच कामाची मागणी करणाऱ्या मजुरांना संबंधित ग्रामपंचायत किंवा पाच किलोमीटरच्या परिसरात रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
जॉबकार्ड नसलेल्या कुटुंबांचीही नोंदणी
ज्या ग्रामीण मजुरांकडे अद्याप जॉबकार्ड उपलब्ध नाही, अशा पात्र कुटुंबांची नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जॉबकार्ड नसलेल्या कुटुंबांनी संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चारा निर्मिती आणि जलसंधारणावरही भर
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपातील चारा लागवडीची कामे हाती घेण्यात येत आहेत. यामुळे पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, त्याचबरोबर ग्रामीण मजुरांनाही रोजगार मिळणार आहे.
जलतारा प्रकल्पांतर्गत शेततळी, सिंचन विहिरी आणि अन्य जलसंधारणाची कामेही हाती घेण्यात येत आहेत. यामुळे भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मदत होण्याची अपेक्षा आहे.
रोजगारासोबत गावांच्या विकासालाही चालना
दुष्काळी परिस्थितीत रोजगारनिर्मिती, जलसुरक्षा, पशुधनासाठी चारा उपलब्धता आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास या चारही बाबींवर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील ५२ हजार ६६० नियोजित कामांमधून प्रत्यक्ष किती मजुरांना रोजगार मिळतो, याकडे आता ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रोजगाराची आवश्यकता असलेल्या मजुरांनी ग्रामपंचायत स्तरावर कामाची मागणी नोंदवावी किंवा जिल्हास्तरीय मदत कक्षाच्या ८६६६९ १७९१३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
स्रोत : महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (DGIPR)
आपलं सत्य अहिल्यानगर
सत्य, विश्वास आणि जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता.
संपादक : रवीकुमार शिंदे
#अहिल्यानगर #रोजगारहमी #मागेलत्यालाकाम #जिल्हाधिकारी #DGIPR

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.