निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला सादर करावा!
जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन; बँकेत किंवा मोबाईल ॲपद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ३३५ अन्वये दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व निवृत्तीवेतनधारकांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालय, अहिल्यानगर यांनी केले आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या याद्या संबंधित बँकांकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात, त्या बँकेत जाऊन यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करून हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे. यासाठी बँकेत जाताना आधारकार्ड आणि पॅनकार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
मोबाईलवरूनही डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार
निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यासाठी स्मार्टफोनमधील गुगल प्ले स्टोअरवरून Aadhaar FaceRd आणि Jeevan Pramaan ही ॲप्स डाउनलोड करावीत.
त्यानंतर आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी नोंदवून मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करावा. पुढे नाव, पीपीओ क्रमांक, पेन्शन खाते क्रमांक तसेच निवृत्तीवेतन देणाऱ्या बँकेचे किंवा संस्थेचे नाव अचूक भरावे.
यानंतर मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यासमोर चेहरा धरून डोळ्यांची उघडझाप केल्यानंतर चेहरा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होते. प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा होते आणि प्रमाणपत्राच्या आयडीचा एसएमएस मोबाईलवर प्राप्त होतो.
दाखला वेळेत सादर करण्याचे आवाहन
निवृत्तीवेतन सुरू राहण्याच्या दृष्टीने हयातीचा दाखला सादर करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत प्रत्यक्ष जाऊन किंवा डिजिटल पद्धतीने हयातीच्या दाखल्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालय, अहिल्यानगर यांनी केले आहे.
आपलं सत्य अहिल्यानगर
सत्य, विश्वास आणि जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता.

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.