घरकुल लाभार्थ्यांची मजुरी अडकली; अभियंत्यांच्या चुकीच्या नोंदींचा लाभार्थ्यांना फटका! घरकुल बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच पोर्टलवर पूर्णत्वाची नोंद; संबंधित प्रकरणांचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी
नगर | दि. १६ नोव्हेंबर २०२६
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत नगर तालुक्यातील काही घरकुल लाभार्थ्यांना बांधकामाशी संलग्न रोजगार हमी योजनेची मजुरी मिळण्यात अडचणी येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्ष घरकुल बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच संबंधित अभियंत्यांनी पोर्टलवर घरकुल पूर्ण झाल्याची नोंद केल्यामुळे लाभार्थ्यांची रोजगार हमी योजनेतील मजुरी अडकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी केला आहे.
घरकुल बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याची प्रत्यक्ष पाहणी, छायाचित्रे आणि आवश्यक तांत्रिक नोंदींची पडताळणी करूनच पोर्टलवरील माहिती अद्ययावत करणे अपेक्षित आहे. मात्र काही प्रकरणांत प्रत्यक्ष परिस्थिती आणि पोर्टलवरील नोंदी यामध्ये तफावत असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. यामुळे रोजगार हमी योजनेतील मनुष्यदिवस आणि मजुरी भरणा प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी एकूण एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान टप्प्याटप्प्याने दिले जाते. त्यामध्ये पहिला हप्ता १५ हजार, दुसरा ७० हजार, तिसरा ३० हजार आणि चौथा ५ हजार रुपयांचा समावेश आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेतून ९० ते ९५ दिवसांच्या अकुशल मजुरीचा लाभ मिळण्याची तरतूद आहे.
घरकुल अनुदान आणि रोजगार हमी योजनेतील मजुरी हे दोन स्वतंत्र लाभ आहेत. मात्र मजुरीची रक्कम वेळेवर न मिळाल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही लाभार्थ्यांनी बचत, नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज आणि उसनवारीच्या पैशातून घरांचे बांधकाम पूर्ण केल्याचेही समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या प्रकरणांची विशेष तपासणी करावी. प्रत्यक्ष बांधकामाची स्थिती आणि पोर्टलवरील नोंदी यांची पडताळणी करावी. चुकीच्या नोंदी करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. तांत्रिक त्रुटींमुळे अडकलेली पात्र लाभार्थ्यांची मजुरी नियमानुसार तातडीने अदा करावी. जुन्या नोंदींमधील चुका दुरुस्त करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया राबवावी, अशी मागणी दीपक पाचपुते यांनी केली आहे.
तसेच याप्रकरणी पंचायत समिती व नगर येथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून, घरकुल बांधकामादरम्यान काही तांत्रिक चुका झाल्याचे सांगण्यात आल्याचा दावा पाचपुते यांनी केला आहे.
घरकुल लाभार्थ्यांना न्याय कधी?
घरकुल योजनेचा उद्देश गरीब कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र प्रशासकीय नोंदीतील त्रुटींमुळे लाभार्थ्यांची मजुरी अडकत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची मजुरी मिळावी आणि घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राहावी, अशी मागणी होत आहे.
— रवीकुमार शिंदे
माहिती अधिकार कार्यकर्ता
हिंदी मराठी पत्रकार संघ, तालुका संघटक
आपलं सत्य अहिल्यानगर
#घरकुलयोजना #प्रधानमंत्रीआवासयोजना #रोजगारहमी #घरकुललाभार्थी #मजुरीप्रश्न #ग्रामीणविकास #नगरतालुका #अहिल्यानगर #दीपकपाचपुते #रवीकुमारशिंदे #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.