शिर्डी विमानतळ परिसरात ताज समूहाचे पंचतारांकित हॉटेल उभारणार; पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि ताज समूहामध्ये सामंजस्य करार
शिर्डी : साईनगरी शिर्डीच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि दी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज समूह) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला.
या प्रकल्पामुळे शिर्डी विमानतळावर येणाऱ्या विमान प्रवाशांसह देश-विदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार निवास आणि आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. शिर्डी विमानतळामुळे या भागाची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली आहे. विमानतळ परिसरात जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित करण्यासोबतच पंचतारांकित हॉटेल उभारल्यामुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल.
ताज समूहासारख्या नामांकित हॉटेल उद्योगसमूहाच्या सहभागामुळे शिर्डी विमानतळासह परिसराच्या विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पामुळे पर्यटनवाढीसोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि रोजगारनिर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
शिर्डी विमानतळाच्या विकासकामांनाही अधिक गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
या सामंजस्य करारप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर तसेच ताज समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
साईनगरी शिर्डीच्या पर्यटन क्षेत्रात पंचतारांकित सुविधांची भर पडणार असून धार्मिक पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर
पत्रकार रवीकुमार शिंदे
विश्वसनीय • निष्पक्ष • तेज डिजिटल न्यूज
#Shirdi #TajGroup #ShirdiAirport #DevendraFadnavis #TourismDevelopment #आपलंसत्यअहिल्यानगर


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.