Breaking News

खासगी वाहनांवरील अनधिकृत पोलीस व शासकीय चिन्हांविरोधात

 

खासगी वाहनांवरील अनधिकृत पोलीस व शासकीय चिन्हांविरोधात

राज्यव्यापी कारवाईची मागणी


बेकायदा स्टिकर्स, पदनाम फलक, सायरन, हूटर व काळ्या फिल्मविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे दीपक पाचपुते यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन


अहिल्यानगर : खासगी वाहनांवर ‘पोलीस’, ‘महाराष्ट्र शासन’, विविध शासकीय विभागांची नावे, अधिकृत पदनामे, पोलीस बोधचिन्हे तसेच शासकीय असल्याचा भास निर्माण करणारे अनधिकृत स्टिकर्स व फलक लावण्याच्या प्रकारांविरोधात राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार प्रतिनिधी दीपक पाचपुते यांनी राज्य शासन व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


खासगी वाहनांवर अनधिकृत सायरन, हूटर, नियमबाह्य नंबर प्लेट आणि प्रतिबंधित काळ्या फिल्मचा वापर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. अशा प्रकारांमुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासह शासकीय यंत्रणेच्या अधिकृत ओळखीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


दीपक पाचपुते यांनी निवेदनात गृह विभागाच्या ७ सप्टेंबर २०१५ रोजीच्या परिपत्रकाचा संदर्भ दिला असून, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर पोलीस चिन्ह किंवा ‘पोलीस’ असा फलक लावण्याबाबत निर्बंध असल्याचे नमूद केले आहे. तसेच परिवहन आयुक्त कार्यालयाच्या ५ जुलै २०२२ रोजीच्या सूचना आणि २३ जून २०२३ रोजीच्या गृह विभागाच्या शासनपत्राचाही या संदर्भात विचार करण्याची मागणी केली आहे.


केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्यसभेतील अतारांकित प्रश्न क्रमांक १५३४, दिनांक १२ मार्च २०२५ रोजी दिलेल्या उत्तराचा संदर्भ देत खासगी वाहनांवरील केंद्र व राज्य शासनाच्या स्टिकर्ससंदर्भातील नियम आणि मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदी, कलम १११(२)(ई), कलम १७७ तसेच केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवावी


राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी व संबंधित वाहतूक शाखांना स्पष्ट निर्देश देऊन खासगी वाहनांवरील अनधिकृत पोलीस व शासकीय चिन्हे, पदनामे, फलक आणि स्टिकर्सची तपासणी करावी. नियमबाह्य बाबी आढळल्यास कायद्यानुसार ते हटविण्याची कार्यवाही करून आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाई करावी व दंडाची रक्कम शासनाच्या अधिकृत खात्यात जमा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


अनधिकृत सायरन, हूटर, नियमबाह्य नंबर प्लेट, वाहनांच्या काचांवरील प्रतिबंधित काळी फिल्म आणि इतर नियमभंगांची स्वतंत्रपणे तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, केवळ वाहनावर स्टिकर असल्याच्या कारणावरून सरसकट जप्ती न करता संबंधित कायद्यातील अधिकार व तरतुदींनुसारच कारवाई करावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.


कारवाईचा तपशीलवार अहवाल सादर करण्याची मागणी


प्रत्येक जिल्ह्यात तपासणी केलेल्या वाहनांची संख्या, अनधिकृत फलक व स्टिकर्स हटविलेल्या वाहनांची संख्या, दंडात्मक कारवाई झालेली प्रकरणे आणि प्रलंबित प्रकरणांचा तपशीलवार अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयांना सादर करावा. तसेच या मोहिमेचा नियमित आढावा घेऊन कारवाईत निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, परिवहन आयुक्त, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.


“शासकीय पदनामे, पोलीस चिन्हे आणि अधिकृत ओळखीचा वापर हा कायद्याच्या चौकटीतच झाला पाहिजे. सामान्य नागरिकांची दिशाभूल होऊ नये आणि शासकीय यंत्रणेच्या अधिकारांचा गैरवापर होऊ नये, यासाठी राज्यभर एकसमान तपासणी व कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे,” अशी भूमिका दीपक पाचपुते यांनी व्यक्त केली.


---


पत्रकार रवीकुमार शिंदे

संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर

Executive Member – AIMA MEDIA

Ahilyanagar District, Maharashtra

All India Media Association

हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक

भारतीय पत्रकार अधिकार – महाराष्ट्र राज्य

Tags:

#अहिल्यानगर #दीपकपाचपुते #वाहतूकनियम #पोलीस #महाराष्ट्रशासन



No comments

Note: Only a member of this blog may post a comment.