Breaking News

मनरेगा मजुरांच्या ₹75.51 लाख प्रलंबित मजुरीबाबत शासनाची दखल; कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

अहिल्यानगर, दि. 24 जून 2026 – जामखेड तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची तब्बल ₹75.51 लाखांची प्रलंबित मजुरी अदा करण्यात यावी, यासाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मनरेगा कार्यालय, नागपूर येथून अधिकृत पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे.


मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो मजुरांची मजुरी अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत विविध स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर राज्य मनरेगा कार्यालयाने या प्रकरणाची नोंद घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


प्राप्त पत्रानुसार, मनरेगा योजनेतील 100 दिवसांच्या रोजगारासाठी राज्य शासनाचा हिस्सा असलेला निधी 18 जून 2026 रोजी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाचा हिस्सा ई-फंड मॅनेजमेंट सिस्टम (EFMS) द्वारे थेट लाभार्थी मजुरांच्या बँक खात्यात जमा केला जातो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


जामखेड तालुक्यातील सुमारे ₹75.51 लाखांची प्रलंबित मजुरीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रलंबित मजुरीचा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


मनरेगा ही ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणारी महत्त्वाची योजना असून, मजुरांची मजुरी वेळेत मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन सर्व पात्र मजुरांच्या खात्यात प्रलंबित रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


मनरेगा मजुरांच्या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून, मजुरांच्या हक्कांसाठी भविष्यातही आवाज उठविला जाईल, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली आहे.


— रविकुमार शिंदे

संपादक, आपलं सत्य अहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.