Breaking News

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी

 


- काशीबाई थोरात, विभागीय संपर्क अधिकारी


महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटे, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणाऱ्या आणि जवळपास 36 हजार 500 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचा समावेश असलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या लोकाभिमुख आणि रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या शासक होत्या. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण विकासाला त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी मानले जाते. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात त्यांच्या नावाने ही योजना जाहीर करून शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे.


याआधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 आणि महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 यांसारख्या योजनांद्वारे राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. मात्र कर्जमुक्तीनंतरही अनेक शेतकरी पुन्हा कर्जाच्या दुष्टचक्रात अडकत असल्याचे दिसून आले. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. समितीच्या शिफारशींचा विचार करून ही नवीन योजना लागू करण्यात आली आहे.


या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह दोन लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमुक्ती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी जमीन धारणेची अट ठेवण्यात आलेली नाही. तसेच दोन लाख रुपयांपेक्षा थोडे अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार असून अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर शासन दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी भरणार आहे.


नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही शासनाने मोठी तरतूद केली आहे. पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. यामुळे कर्जफेडीची शिस्त राखणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.


तसेच एकवेळ समझोता योजना (OTS) लागू करून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे.


या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक ठेवण्यात आली असून आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण, जिल्हा बँका तसेच प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या कर्जांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.


ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारा आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा हा निर्णय महाराष्ट्राच्या कृषी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.