Breaking News

कर्जमुक्तीसोबत शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेतीवर शासनाचा भर

 

अहिल्यानगर, दि. २७ जून :-

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ मुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक दिलासा मिळत असताना, भविष्यात पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये यासाठी शासनाने शाश्वत शेतीच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. कमी उत्पादन खर्च, निरोगी माती आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या नैसर्गिक शेतीला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत या उपक्रमाचा व्यापक विस्तार सुरू आहे. जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, राहाता, कोपरगाव, नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर व अहिल्यानगर या तालुक्यांमध्ये नैसर्गिक शेतीचे क्लस्टर कार्यरत आहेत. सुमारे २०२ शेतकरी गट, सुमारे ९ हजार हेक्टर क्षेत्र आणि १७ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला चालना दिली जात आहे.

या उपक्रमासाठी १,२११ लाख रुपयांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून त्यापैकी ३११.८३ लाख रुपयांचा निधी प्रशिक्षण, शेतकरी गट निर्मिती, प्रात्यक्षिके, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती व विपणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी वापरण्यात आला आहे.

रासायनिक खतांचा वाढता वापर, जमिनीची घटती सुपीकता आणि वाढता उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती हा प्रभावी व शाश्वत पर्याय ठरत आहे. जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर करून पर्यावरणपूरक शेतीला चालना दिली जात आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण, जैविक इनपुट रिसोर्स सेंटरची उभारणी, तसेच उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन यावर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे नैसर्गिक उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात लक्षणीय घट होऊन शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढतो, तसेच ग्राहकांना रासायनिक अवशेषमुक्त व सुरक्षित अन्नधान्य उपलब्ध होते. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ही शेती भविष्यातील शाश्वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरत आहे.

कर्जमुक्ती योजना तात्काळ दिलासा देणारी असली, तरी नैसर्गिक शेती शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देणारी ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.