Breaking News

जायकवाडी फेरनियोजन व सिंचनवाढीच्या प्रस्तावांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा



मुंबई, दि. ३० जून : जायकवाडी प्रकल्पाच्या फेरनियोजनासह धरणात मत्स्यबीज सोडण्याचा प्रस्ताव तसेच जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन आणि जाफ्राबाद परिसरातील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून सिंचन क्षमता वाढविण्याच्या प्रस्तावांचा जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत जायकवाडी प्रकल्पाच्या फेरनियोजनांतर्गत पाणी वापर, सिंचन क्षेत्राचा विस्तार, विविध उपसा सिंचन योजनांचा समावेश तसेच सुधारित नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. या कामांना गती देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच जायकवाडी धरणात मत्स्यबीज सोडण्याच्या प्रस्तावाबाबत पर्यावरणीय, तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींचा सर्वंकष विचार करून संबंधित विभागांनी समन्वयाने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन आणि जाफ्राबाद भागातील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून सिंचन क्षमता वाढविण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांसाठी आवश्यक सर्वेक्षण, तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

बैठकीस आमदार नारायण कुचे, आमदार विलास भुमरे, आमदार प्रकाश सोळंके, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.