आदिवासी भागात पाणीपुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
अकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत विकासकामे, पाणीपुरवठा व प्रलंबित योजनांचा घेतला आढावा
शिर्डी, दि. २८ : आदिवासी भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. अकोले तालुक्यात आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत त्यांनी पाणीपुरवठा, विकासकामे आणि प्रलंबित योजनांचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीस आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी अमर माने तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, अकोले तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी गावपातळीवर प्रभावी नियोजन आवश्यक आहे. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची वस्तुस्थितीशी सुसंगत माहिती प्रशासनाने सादर करावी. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी पाणीपुरवठा अखंडित ठेवण्यावर भर द्यावा.
बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या विविध अपूर्ण पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. ३२ गावे, एक दरी आणि शमशेरपूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतील रखडलेल्या कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. देवठाण पाणीपुरवठा योजनेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले.
याशिवाय लहीत खुर्द येथील पाझर तलावाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. धामणगाव आवारी येथील उच्चस्तरीय पाइपलाइनचे पाणी स्थानिक बंधाऱ्यात सोडण्याबाबत तातडीने सर्वेक्षण पूर्ण करण्यास सांगण्यात आले.
आदिवासी विकास विभागांतर्गत सुमारे ५०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी कामांची गुणवत्ता आणि वेळेत अंमलबजावणी यावर विशेष भर दिला. कळंबसह अन्य गावांच्या रेड झोन व पुनर्वसनाच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यापुढे प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आढावा घेऊन कामांच्या प्रगतीचे नियमित परीक्षण केले जाईल. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत समन्वय राखत मंजुरीपासून अंमलबजावणीपर्यंतची प्रक्रिया पारदर्शक ठेवावी आणि नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, राजूर तालुक्यातील मवेशी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.