Breaking News

निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीप्रकरणी 'कृषी गौरव फर्टिलायझर्स'वर कृषी विभागाची मोठी कारवाई २१.८० लाखांचा २,०३४ गोण्यांचा बेकायदेशीर खतसाठा जप्त; परवाना निलंबित, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल


अहिल्यानगर, दि. ३० जून : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील मे. कृषी गौरव फर्टिलायझर्स या खत विक्री आस्थापनेवर कृषी विभागाने मोठी कारवाई करत २१ लाख ८० हजार ४८६ रुपये किमतीचा २,०३४ गोण्यांचा बेकायदेशीर खतसाठा जप्त केला आहे. संबंधित आस्थापनेचा खत विक्री परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला असून, मालक किरण चंद्रकांत दौंडकर यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विभागाच्या पथकाने १५ जून २०२६ रोजी एमआयडीसी, शिंगवे तुकाई येथील आस्थापनेची तपासणी केली. यावेळी खत विक्री व साठवणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि नोंदवह्या उपलब्ध नसल्याचे आढळून आले. तसेच विविध कंपन्यांच्या नावांचा वापर करून बेकायदेशीररीत्या तयार करण्यात आलेल्या रासायनिक खतांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

जप्त खतांचे नमुने पुणे येथील खत नियंत्रण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. नियमानुसार ३० दिवसांचा कालावधी असतानाही कृषी विभागाने अवघ्या १० दिवसांत तपासणी पूर्ण करून अहवाल प्राप्त केला. प्रयोगशाळेच्या अहवालात संबंधित खतांचे पीएच, सेंद्रिय कर्ब आणि कार्बन-नायट्रोजन (सी/एन) गुणोत्तर हे विहित मानकांनुसार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित खते निकृष्ट दर्जाची असल्याचे निष्पन्न झाले.

कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाची अथवा बेकायदेशीर खते विकणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाकडून भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहील. अशा प्रकरणांमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.